Ad will apear here
Next
कोकणातली आत्मनिर्भरता सुस्पष्ट दाखवणारी ‘झूम लेन्स’


केल्याने होत आहे रे ।
आधी केलेचि पाहिजे।।
यत्न तो देव जाणावा ।
अंतरी धरिता बरे ।।

असा एक श्लोक आहे, जो आपण बऱ्याचदा वापरतो. करोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर या श्लोकाचा आपण अंगीकार केला पाहिजे असं मला मनोमन वाटतं. कोकणच्या बाबतीत म्हणाल, तर शहराच्या दिशेने गेलेले अनेक तरुण आज पुन्हा कोकणात परतले आहेत. परतण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचं एक मन सांगतंय, की इथेच काही तरी केलं पाहिजे आणि दुसरं मन विचारतंय काही करणं मला जमेल का? अशा द्विधा मनस्थितीत असलेल्या या युवकांना प्रेरणा देणारी गोष्ट आज मी इथे सांगणार आहे. 

गोष्ट आहे आपल्याच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपल्यासारख्याच एका सामान्य कुटुंबातल्या तरुणाची... ‘रत्नकांत चव्हाण’ हे त्याचं नाव आणि माणगाव खोऱ्यातलं गोठोस हे त्याचं गाव.

वीस वर्षांपूर्वी कोकणातला समस्त तरुण वर्ग पाहत होता, तसंच स्वप्न रविकांतने पाहिलं. जमेल तसं शिक्षण घ्यायचं आणि नोकरीसाठी थेट शहर गाठायचं. त्याने आपलं बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं, पुढे इलेक्ट्रॉनिक्स ट्रेड घेऊन दोन वर्षांचा आयटीआय कोर्स केला आणि नोकरीनिमित्ताने पुणे गाठलं. 

तीन-चार वर्षं पुण्यात काढल्यावर त्याला जरा जास्त पगाराच्या नोकरीची गोव्यात संधी चालून आली. गावापासून गोवा जवळ असल्याने त्याने ती स्वीकारली. गोव्यातल्या जीकेबी हायटेक लेन्स या कंपनीत लेन्स बनविण्याच्या कामी रत्नकांत रुजू झाला. मुळात अंगावर पडलेलं कोणतंही काम अगदी मनापासून करणं हा त्याचा स्वभाव असल्याने त्याची कामातली प्रगती कंपनीच्या नजरेत फार चांगली होती. दोन-तीन वर्षे गेल्यावर कंपनीने त्याला याच कामासाठी ‘शारजा’ येथे पाठवलं. उमेदीची वर्षे आणि चांगला पगार या दोन्ही बाबींचा विचार करता त्याने ते आव्हान स्वीकारलं. 

मी आव्हान अशासाठी म्हणालो, की एव्हाना लग्नकार्य पार पडलेलं होतं, एक कन्यारत्नसुद्धा पदरात होतं. अशा वेळी कुटुंबापासून लांब जाऊन परदेशात नोकरी करणं, तेसुद्धा आखाती देशात हे मानसिकदृष्ट्या बरंच कठीण होतं. 

याच लेन्स बनविण्याच्या कामावर रत्नकांतने शारजात सहा वर्षे नोकरी केली. आठ तासाची शिफ्ट आणि दोन मशीनवर उभ्याने करावं लागणारं काम, यामुळे त्याच्या लक्षात आलं, की आपण फार काळ हे काम करू शकत नाही. मग स्वतःचा व्यवसाय म्हणून दुसरं काय करू शकतो याची नेटच्या माध्यमातून चाचपणी सुरू झाली. आपल्याला शक्य असलेल्या सगळ्या पर्यायांचा अभ्यास करता करता एक गोष्ट त्याच्या लक्षात आली, ती म्हणजे पुन्हा आपल्या गावी परतून आपल्या आवडीची शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करणं हेच येणाऱ्या काळाला अनुसरून आहे. माझ्या मते त्याचा हा असा विचार पक्का होण्यासाठी तो बनवत असलेल्या लेन्सचं तंत्रच त्याला फार उपयोगी पडलं असावं. कारण लेन्समुळे आपल्याला दूरचं स्पष्ट दिसतं, जे त्याला योग्य वेळी दिसलं. 

नोकरी सोडून रत्नकांत गावी परतला. खरं तर अशी चांगल्या पगाराची नोकरी सोडून वेगळी वाट स्वीकारणं सोपं नसतं. अनेकांचं बऱ्यापैकी आयुष्यच या विचारात संपून जातं, पण निर्णय होत नाही. तीन वर्षांपूर्वी रत्नकांत गावी आला आणि नोकरीत असताना खरेदी केलेल्या एक एकर जमिनीत छोटंसं घर बांधून आपला संसार सुरू केला. वडिलोपार्जित बागायती होती. त्याच्या जोडीला आणखी नवीन लागवड केली. पाण्यासाठी शेतविहीर, पाइपलाइन या आवश्यक बाबी करून घेतल्या आणि शेती सुरू केली. भातपिकासोबत कडधान्य, केळी लागवड, भाजीपाला लागवड करणं सुरू झालं. सेंद्रिय पद्धतीने करत असलेल्या शेतीत स्वतः राबल्याने चांगलं उत्पन्न मिळत होतं, त्यातलं आपल्यासाठी ठेवून उरलेल्या धान्याची, भाजीपाल्याची विक्रीसुद्धा होत होती. घर व्यवस्थित चालत होतं. यातून मिळत असलेली रक्कम ही पूर्वीच्या पगाराच्या दहा टक्केसुद्धा नव्हती; पण आरोग्य आणि कौटुंबिक समाधान चारपटीहून जास्त मिळत होतं. 

पुढे शेतीची ही कामं रूटीन झाल्यावर त्याला पूरक असा छोटासा व्यवसाय करायचं त्याने ठरवलं. 

घराच्या परसदारात त्याने अस्सल गावरान जातीची काही कोंबडी पाळली होती. त्यातूनच त्याला कल्पना सुचली, की गावठी जातीच्या कोंबड्यांची हॅचरी करावी, जी जवळपासच्या भागात कोणी केलेली नाही. त्याने या विषयाचा नीट अभ्यास केला आणि सहाशे अंडी उबवू शकेल अशा कपॅसिटीची ‘मॅग्नम’ या कंपनीची इनक्युबेटर हॅचरी मशीन खरेदी केली. सोबत त्याला अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी डबल बॅटरीचा इन्व्हर्टर घेतला. या दोन्हीसाठीची त्याची गुंतवणूक एक लाखाच्या पुढे गेली नाही. या छोट्या प्रकल्पाला जागाही फार लागत नाही. घराच्या एखाद्या रिकाम्या खोलीत हा सगळा कारभार करता येतो. 



या वर्षीच्या मार्चमध्ये रत्नकांतची ही हॅचरी सुरू झाली. मशीनची सहाशे अंड्यांची कपॅसिटी असली तरी अंड्यांच्या लहान मोठ्या आकारामुळे त्यात पाचशे तीस इतकी अंडी उबवता येतात. रत्नकांत आजूबाजूच्या गावातून ही उबवणुकीची ताजी अंडी खरेदी करतो. त्यात गावठी, कावेरी, डीपी क्रॉस, कडकनाथ या सर्व प्रकारची अंडी असतात. 

भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानच्या पुढाकाराने तिथे ‘अंड्यांचे गाव’ साकारले आहे, त्याचा उपयोग ही अंडी इथेच उपलब्ध होण्यासाठी झाला. त्याचा ग्राहकवर्गसुद्धा त्याच भागात निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना ज्या जातीचे पक्षी हवे असतात, त्याप्रमाणे तो पुरवठा करतो. सगळ्याच जातींना चांगली मागणी असल्याचे तो सांगतो. 

तूर्तास अंड्यांची गरज कमी असल्याने ब्रीडसाठी लागणारे पक्षी तू स्वतः का पाळत नाहीस, या माझ्या प्रश्नावर त्याने दिलेले उत्तर खूप काही सांगून जाणारे आहे. तो म्हणतो - ‘आत्मकेंद्री होऊन सगळं एकट्याने करण्यापेक्षा हे एक सर्किट तयार व्हावं. त्यात अनेकांना सामावून घ्यावं. लोकांनी जोडधंदा म्हणून परसदारात कोंबडी पाळावी, मी अंडी खरेदी करून त्याचे पक्षी तयार करावे आणि पुन्हा इथूनच खरेदी होऊन ते पक्षी त्यांच्या परसदारात जावून वाढावेत. यासाठी हवं तर माझ्या उबवणूक यंत्राची कपॅसिटी वाढवेन.’ 

या सगळ्यात मेहनतीचा आणि वेळ देण्याचा भाग किती असतो यावर बोलताना तो म्हणाला, ‘एकदा का अंडी आणली आणि ती केमिकलने स्वच्छ करून घेतली, की मग मशीनच्या सेटरवर लावायची, त्यानंतरचे अठरा दिवस फक्त ठराविक वेळाने मशीनचे पाणी आणि तापमानावर लक्ष ठेवावे लागते. जे काम आता माझी बायको आणि लहान मुलगीसुद्धा करते. अठराव्या दिवशी ती अंडी काढून मशिनच्या खालच्या भागातील हॅचर ट्रेमध्ये ठेवावी लागतात. एकविसाव्या दिवशी त्यातून पिल्ले बाहेर येतात. त्यांना साफ करून त्यांचे पंख वाळवावे लागतात. इतकं झालं, की त्याच दिवशी त्यांची विक्री करता येते. त्यानंतर साफसफाई वगैरेचा विचार करता पंचवीस दिवस म्हणजे साधारण महिनाभराने एक बॅच लावता येते. त्यात फारशी मेहनत अथवा पूर्ण वेळ द्यावा लागत नाही.’ 

या व्यवसायाचे आर्थिक गणित सांगताना रत्नकांत म्हणाला, ‘गुंतवणूक एक लाखाची आहे. अंड्याची किंमत आठ ते १० रुपये इतकी असते. उबवणुकीसाठी मशीनला फार कमी युनिट वीज लागते. अगदी महिना १००-२००च्या पुढे वीजबिल जात नाही. गावरान, कावेरी, डीपी क्रॉस, कडकनाथ या जातीच्या पिल्लांचे दर वेगवेगळे आहेत. त्यामुळे एका पक्ष्याची विक्री सरासरी २५ रुपयांनी होते. हे सर्व स्थानिक स्तरावर होत असल्याने इतर कोणते खर्च नाहीत, त्यामुळे महिन्याकाठी तीन ते चार हजार रुपये हातात राहतात.’ 

‘माझा हा एक पायलट प्रोजेक्ट आहे. पुढच्या काळात अंडी वाढली तर जास्त अंड्यासाठीची मशीन घ्यायचा विचार असून, पूर्णवेळ या व्यवसायासाठी देणार आहे,’ असंही तो म्हणाला.

मला वाटतं शहरातून परतलेल्या आणि इथल्या तरुणांनी आता रत्नकांतच्या लेन्समधून भविष्याकडे पाहत ‘आत्मनिर्भर’ झालं पाहिजे. तो सेंद्रिय पद्धतीची दुबार शेती करतो, कडधान्य पिकवतो, केळी, भाजीपाला करतो, त्यानंतर कोंबडीपालन, हॅचरीसारखे शेतीपूरक व्यवसाय करतो आणि मोकळ्या दिवसात त्याच्या अंगी जे कौशल्य आहे त्या वेल्डिंगच्या कामाला जातो. या त्याच्या कष्टातून त्याच्या चौकोनी कुटुंबाचा संसार सुखनैव चालतो. 

अशा पद्धतीने युवकांनी सुरुवात केली तर त्याला पाठबळ देण्यासाठी आपल्या जिल्ह्यातली ग्रामविकासातील अग्रणी ‘भगीरथ प्रतिष्ठान’ ही संस्था समर्थ आहे. शासकीय योजना, बँक साहाय्य यासाठी ‘सिंधू आत्मनिर्भर अभियान’सुद्धा आहे. 

परवाच भगीरथ संस्थेचे डॉ. प्रसाद देवधर यांनी रत्नकांतच्या हॅचरीला भेट दिली. त्याला प्रोत्साहन देतानाच त्याच्या गावातील ५० महिलांना कावेरी जातीच्या एकूण ५०० कोंबड्या ५० टक्के अनुदानावर संस्थेने देऊ केल्या आहेत. असं केल्याने रत्नकांतसाठी गावातच ब्रीडिंग स्टॉक उपलब्ध होईल आणि शेतकऱ्यांना शाश्वत विक्री असलेल्या उत्पादनाचा जोडधंदासुद्धा मिळेल. रत्नकांतच्या डोक्यात असलेलं एक सर्किट त्या निमित्ताने पूर्ण होईल. 

म्हणून मी लेखाच्या सुरुवातीला म्हटलं आहे... 
केल्याने होत आहे रे.. 
आधी केलेचि पाहिजे... 

- प्रभाकर सावंत
संपर्क : ९४२२३ ७३८५५ 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MXRICP
Similar Posts
‘योजक’ शेतकरी हा बियाणं पेरण्यापासून, त्याचं रुजणं, त्याचं वाढणं, त्याचं डोलणं, असं करत करत ते पीक हाती येईपर्यंतचा सगळा प्रवास स्वतः एन्जॉय करत असतो. तो फार संवेदनशील असतो. त्यामुळे नांगरणी यंत्रांकडून हाताला जाणवणाऱ्या कंपनापेक्षा बैलाच्या पाठीवर हात मारल्यानंतरचं बैलाचं शहारणारं अंग त्याला जास्त सुखावणारं असतं
‘पथदर्शी’ त्या काळच्या मागास मानल्या जाणाऱ्या अनेक जाती-जमातीतील समाज धुरिणांनी स्वतः शिक्षण घेतलं, वेगवेगळ्या विषयाचं ज्ञान मिळवलं, जगाचा अनुभव घेतला, आणि या सर्वांचं महत्त्व लक्षात आल्यावर आपल्या समाजातील लोकांना विद्या, मती, नीती, गती, वित्त अशा प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. याच संदर्भाने एका समाजातील
पारंपरिक भात वाणांचे जतन आणि संवर्धन : सिंधुदुर्गातील प्रयोग शेतीतल्या पारंपरिक बियाण्यांची देशभरातल्या सामान्य लोकांमध्ये चर्चा सुरू झाली ती अहमदनगर जिल्ह्यातल्या बीजमाता ‘राहीबाई पोपेरे’ यांना मिळालेल्या पद्मश्री पुरस्काराने. पारंपरिक बियाण्यांचे ३५०हून अधिक वाण या बीजमातेने अनोख्या रीतीने जतन केलेले आहेत. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातही असे काही प्रयोग सुरू असल्याचे समजले म्हणून हा लेखप्रपंच
‘दरवळ’ सोनचाफ्याच्या कलमांचा स्वतःच्या नावाचा ब्रँड तयार करणाऱ्या, अस्सल कोकणच्या लाल मातीतल्या सुगंधवेड्या ‘उदय गोपीनाथ वेलणकर’ यांची ही यशोगाथा...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language